अतिवृष्टी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला महापूर आला. सांगली शहरात कृष्णा नदीची पाणीपातळी विक्रमी ५५ फुटांपर्यंत पोहोचली होती. सोमवारी सकाळपासून महापूर ओसरू लागला आहे. मात्र, महापुराने विस्थापित झालेल्या लोकांसमोर आता मगरींचे संकट उभे राहिले आहे.
पुराचे पाणी ओसरू लागताच नागरिक घरांकडे परतू लागले आहेत. यावेळी पूरग्रस्तांना मगरींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी दुपारी कसबे डिग्रज येथे एका घरावर मगर आढळली, तर याच परिसरात पुराच्या पाण्यात मुक्त संचार करणाऱ्या मगरीचा व्हिडिओ काही तरुणांनी चित्रित केला आहे.
थेट गावातच मगरींचा वावर सुरू असल्याने पूरग्रस्तांना घराकडे परतण्याची भीती वाटत आहे. अजूनही अनेक ठिकाणी पुराचे पाणी असल्याने पूरग्रस्तांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. या स्थितीत मगरींकडून हल्ले झाल्यास जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीत यापूर्वीही मगरींकडून हल्ले झाले आहेत. यात जनावरांसह नागरिकांनाही जीव गमवावे लागले होते. कसबे डिग्रज, चोपडेवाडी, भिलवडी, औदुंबर या परिसरात नागरिकांनी अनेकदा मगरींचे हल्ले अनुभवले आहेत. याच परिसरात आता पुन्हा मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times