वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बनारस हिंदू विद्यापीठाच्या एका गटाने वाराणसीमध्ये चार हजार वर्षांपूर्वीचे शिल्प ग्राम शोधून काढले आहे. तज्ज्ञांच्या मते प्राचीन ग्रंथांमध्ये नोंदविलेल्या शिल्पांपैकी हे एक गाव आहे.

वाराणसीपासून १३ किमी अंतरावर असलेल्या बभानियाव गावात बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने प्राथमिक सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. वाराणसीशी संबंधित साहित्यात उल्लेख आढळलेल्या गावाच्या येथे खुणा सापडल्या आहेत. ‘बीएचयू’च्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे प्रा. ए. के. दुबे यांनी सांगितले, ‘वाराणसी जिल्ह्यातील बभानियाव गावात इ. स. पूर्व आठवे शतक ते पाचवे शतक या दरम्यानचे मंदिर, दोन हजार वर्षे जुन्या भिंती सापडल्या आहेत.’ वाराणसीपासून जवळ असल्यामुळे याचे खास महत्त्व आहे. बभानियाव गाव पूर्वी वाराणसीचेच एक छोटे उपनगर असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

‘संबंधित ठिकाणामध्ये आढळलेल्या घटकांनुसार हा ढाचा सुमारे साडेतीन हजार ते चार हजार वर्षे जुना असावा,’ असे दुबे यांनी स्पष्ट केले. रविवारपासून या ठिकाणी उत्खननास सुरुवात झाली असून, दुबे यांचाही उत्खनन गटात समावेश आहे. प्राचीन नोंदींनुसार वाराणसी हे गाव पाच हजार वर्षांपूर्वी स्थापन झाले आहे. मात्र, आजवरच्या अभ्यासानुसार ते तीन हजार वर्षे जुने असावे. शोध लागलेले हे गाव वाराणसीचे उपनगर असावे आणि नंतर या गावाला शहरी चेहरा आला असावा, असे दुबे म्हणाले.

दरम्यान, हे गाव त्या काळात महत्त्वाचे असावे, असे पुरातत्त्व खात्याचे माजी सहायक संचालक बी. आर. मणी यांनी म्हटले आहे. मणी यांनी बीएचयूच्या गटाला प्राथमिक पाहणीसाठी बोलावले होते. या गावात सापडलेल्या खांबावर ब्राह्मी लिपीत दोन ओळी लिहिलेल्या असून, त्यावरूनच ते ३५०० ते ४००० वर्षे जुने असावे, असे मानण्यात येत आहे. ‘उत्खनन पूर्ण झाल्यावर चित्र स्पष्ट होईल,’ असेही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here