अतिशय हुशार आणि स्मार्ट अधिकारी अशी राकेश अस्थाना ( rakesh asthana ) यांची ओळख आहे. चारा घोटाळ्यासंबंधीत प्रकरणांच्या चौकशीत राकेश अस्थाना यांनी मोठी भूमिका बजावली होती. सीबीआयचे एसपी असताना त्यांनी चारा घोटाळा प्रकरणाची चौकशी केली होती. अस्थाना हे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त महासंचालकही होते. त्यांच्या देखरेखीखाली अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युशीसंबंधीत अंमली पदार्थ प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.
का महत्त्वाची आहे अस्थाना यांची नियुक्ती?
यूटी कॅडरचे एन. एन. श्रीवास्तवर ३० जूनला दिल्ली पोलिस आयुक्तपदावरून नियुक्त झाले होते. यानंतर बालाजी श्रीवास्तव यांना दिल्लीचे आयुक्त करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीत १९ वर्षांनंतर यूटी कॅडरच्या बाहेरील अधिकाऱ्याला सर्वोच्च पदावर स्थान दिलं गेलं आहे. यापूर्वी १९९६ मध्ये आयपीएस अधिकारी अजय शर्मा यांना ही संधी मिळाली होती. उत्तर प्रदेश कॅडर असतानाही अजय शर्मा याना जुलै १९९९ मध्ये दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं होतं. ते जून २००२ पर्यंत पदावर होते.
कोण आहेत अस्थाना?
राकेश अस्थाना हे मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. यापूर्वी ते सीबीआयचे विशेष संचालक होते. त्यावेळी तत्कालीन सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. राकेश अस्थाना हे सीबीआयचे विशेष संचालक आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक होते. सीबीआयमध्ये नियुक्ती वेळी तत्कालीन संचालक अलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. विशेष म्हणजे अलोक वर्माही आधी दिल्लीचे पोलिस आयुक्त होते.
राकेश अस्थाना यांनी बिहारच्या नेतरहाट (आता झारखंडमध्ये आहे) विद्यालयात प्रथामिक शिक्षण घेतलं. शालेत अतिशय हुशार विद्यार्थी होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना ते आपला आदर्श मानतात. उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आले. त्यावेळी ते सर्वात हुशार विद्यार्थी म्हणूनच ओळखले गेले. पहिल्याच प्रयत्नात ते केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीची परीक्षा पास झाले.
इशरत जहांप्रकरणात आरोप
गुजरातवमधील इशरत जहां चकमक प्रकरणी राकेश अस्थाना यांनी फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्याला पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी भाग पाडले होते, असा आरोप गुजरात कॅडरमधील आयपीएस अधिकारी सतीश वर्मा यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करून केला होता. सखोल चौकशी करणारे अधिकारी अशी वर्मा यांची ओळख होती.
आसाराम बापूच्या मुलाला अटक
आसाराम बापूला अट केल्यानंतर त्याचा मुलगा नारायण साई हा मानवी तस्करीत समील असल्याची चर्चा होती. गुजरात सरकारने त्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. याची जबाबदारी राकेश अस्थाना यांच्यावर देण्यात आली होती.
मुलीच्या लग्नामुळे राज्यभर चर्चा
अस्थाना यांना ‘मॅन ऑफ स्टाइल’ असं म्हटलं जातं. बडोद्यात २०१६ मध्ये त्यांच्या मुलीचं धुमधडाक्यात लग्न झालं. संपूर्ण राज्यात या लग्नाची चर्चा होती. आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमात अस्थाना यांनी आपल्या पाहुण्यांचा फाइव्ह-स्टार सत्कार केला होता. सर्व हॉटेल्सनी अस्थाना आणि त्यांच्या कुटुंबाला मोफत सेवा दिल्याचं हे नंतर उघड झालं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times