अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावातील आदिवासी महिलेला दुसरीही मुलगीच झाल्याने तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असूनही सासरच्या मंडळींनी या मायलेकींकडे पाठ फिरवली होती. याबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस, महिला व बालकल्याण विभाग यांनी या प्रकरणात मध्यस्ती केली आणि मनिषाच्या सासरच्या मंडळींनी मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेतली. मनिषा आणि तिच्या २० दिवसांच्या तान्हुलीला पोलिसांनी त्यांच्या स्वाधीन केले.
सरकारकडून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याबाबत घोषणा आणि जनजागृती केली जात असली तरी प्रत्यक्षात आजही मुलगी असल्याचा अनुभव पुन्हा एकदा उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुगणालयात एका प्रकरणातून समोर आला. गेले दहा दिवस येथे एक आदिवासी महिला आपल्या २० दिवसांच्या आजारी मुलीवर उपचार घेत होती. मनिषाला दुसरीही मुलगीच झाल्याने, तिच्या पती आणि सासरच्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती. या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी तिला डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली, मात्र घरचे आपल्याला घेणार नाहीत, या भीतीने मनिषाने मुलीसह रुग्णालयातच राहणे पसंत केले होते. अखेर याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाने हिललाइन पोलिस ठाण्याला पत्र दिले. तसेच याबाबत वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी बातम्या प्रसारित करताच, पोलिस प्रशासन आणि महिला व बालकल्याण विभागाची धावपळ सुरू झाली. शनिवारी रात्री उशिरा मनिषाच्या सासरच्या मंडळींना पोलिसांनी बोलावून घेतले होते. तसेच त्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी आणि पोलिसांनी समज देत कायद्याचा धाक दाखवला. मनिषा आणि तिच्या मुलीला सुखरूप घरी नेण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मनिषा आणि तिच्या मुलीला सासरच्या दोन महिलांनी घरी नेल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times