इंदूरः इंदूरमध्ये केस चोरीचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. इंदूरहून हावडा जाणाऱ्या रेल्वेत १० क्विंटलहून अधिक वजनाचे केस चोरीला गेले आहेत. चोरी झालेल्या केसांची किंमत ही ६० लाख रुपये होती. पण या प्रकरणी अद्याप कुठलीही एफआयआर दाखल झालेली नाही. या प्रकरणी महाराष्ट्रातील काही फेरीवाल्यांना एफआयआर दाखल करण्यासाठी रेल्वे पोलिसांत फेऱ्या मारव्या लागत आहेत.

फेरीवाले १ किलो केस ५ हजार रुपयांपर्यंत विकतात. केस गोळा करण्यासाठी ते गल्लोगल्ली फिरतात. अटक एकच आहे, केस कापलेले नतर ते कंगव्यामुळे गळलेले असावेत आणि तेही महिलांचेच हवेत. केलांची लांबी ही किमान ८ इंच हवी आहे. या केसांपासून विग बवण्यात येतात.

महाराष्ट्रातील १५० फेरीवाले हे इंदूरसह आजूबाजूच्या भागांमध्ये घरोघरी जाऊन केस गोळा करतात. १० ग्रॅम केस २० रुपयांमध्ये खरेदी करतात. ६ जुलै २०२१ ला इंदूर रेल्वे स्टेशनवरून कोलकाता-हावडा ट्रेनद्वारे केसांच्या २२ गोण्या पार्सल करण्यात आल्या होत्या. त्याच्या पावतीचा क्रमांक 63498 होता. यातील फक्त तीनच गोण्या या नियोजित वेळेत हावडामध्ये पोहोचल्या. तर १९ गोण्या चोरी झाल्या. यानंतर फेरीवाला सुनिल आणि त्याचे सहकारी इंदूरमध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांत गेले. पण पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. पावतीवर नकली केसांचा उल्लेख आहे आणि किंमतही कमी लिहिण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

गळालेल्या केसांचा मोठा व्यापार

फेरीवाले घरोघरी जाऊन केस गोळा करतात. गुणवत्तेच्या हिशेबाने १० ग्रॅम केस २० रुपयांत खरेदी केले जातात. एका दिवसात एक जण २०० ते २५० ग्रॅम केस गोळा करतो.

गोळा केलेले केस एका ठिकाणी जमा करण्यात येतात. इथे पुन्हा गुणवत्तेनुसार ते वेगवेगळे केले जातात. यानंतर गोण्यांमध्ये भरून ट्रेनने ते पश्चिम बंगालमधील हावडामध्ये पाठवले जातात. १ किलो केस हे गुणवत्ता चांगली असल्यास ५ हजार रुपयांपर्यंत विकले जातात.

कोलकाताहून ९० टक्के केस विग बनवण्यासाठी चीनला पाठवण्यात येतात. तर १० टक्के केसांद्वारे कोलकात्यातच विग तयार केले जातात.

एक वर्षाची मेहनत चोरीला गेली

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून केस हवडाला पाठवतो. पण यावेळी रेल्वेच्या पार्सल विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका बसला. पोलिसही आमची मदत करत नाहीएत. २२ गोण्यांमध्ये १००० किलोहून अधिक वजनाचे केस होते. ही आमची १ वर्षाची कमाई होती. जिच्यावर पाणी फेरले गेले, असं सुनील याने सांगितलं.

केसांच्या या व्यवसायात १५० हून अधिक जण आहेत. हे सर्वजण इंदूरसह आजूबाजूच्या भागांमध्ये फिरून केस गोळा करतात. केसांच्या बदल्यात ते रोख रक्कम देतात. यामुळे त्यांनी साठवलेले पैसेही आता संपले आहेत. त्यांचे आता खाण्या-पिण्याचेही हाल होत आहेत. हावडामधील पार्सल विभागाशी आम्ही संपर्क केला आहे. त्यांना हावडामध्ये केसांच्या गोण्या मिळाल्या नसतील तर या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असं इंदूर आरपीएफचे प्रभारी हरीश कुमार यांनी सांगितलं.

गुजरातमधील केस सर्वात चांगले

मध्य प्रदेशातून सध्या ५ ते ६ टक्केच केस मिळतात. इथली केसांची गुणवत्ता ही फार चांगली नाही. ते कमकुवत आणि कोरडे असतात. बाजारात गुजरातच्या केसांना अधिक मागणी आहे. तेथील केस हे बळकट आणि चमकदार असतात. करोना संसर्गामुळे व्यावसायत मंदी आहे, असं व्यापारी मोहम्मद हसन यांनी सांगितलं. एका अंदाजानुसार संपूर्ण मध्य प्रदेशात वर्षाला ५० कोटी रुपयांचा केसांचा व्यापार होतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

104 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here