मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नगर जिल्ह्यात आकडे कमी होऊ लागले. जूनच्या पहिल्या आठवड्यात आकडे हजाराच्या आत आले. ३ जून रोजी १३२६ दैनंदिन करोना बाधित रुग्ण होते. त्यानंतर मात्र संख्या कमी होत जाऊन ५ जूनला ३७४ वर आली. नंतर ती ३५० ते ५०० च्या दरम्यान स्थिरावली होती. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात ती पुन्हा वाढू लागली. दोन दिवसांपूर्वी दैनंदिन रुग्ण संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. बुधवारी १,२२४ नवे रुग्ण नोंदले गेले. ५९७ जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याने नवीन बाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मृत्यू दर २.०८ आहे. सध्या जिल्ह्यात ५,४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्याही दुपटीहून अधिक वाढल्याने रुग्णालयांत रिकामे झालेले बेड पुन्हा व्यापले जाऊ लागले आहेत.
गेल्या काही काळापासून पारनेरची स्थिती चिंताजनक होती. बुधवारी संगमनेरने पारनेरला मागे टाकले आहे. संगमनेरमध्ये २९१ रुग्ण नोंदले गेले. तर पारनेरला १६६ रुग्ण नोंदले गेले. याशिवाय कर्जत आणि जामखेडमध्येही रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नगर शहरात तुलनेत कमी २४ रुग्ण असले तरी नगर ग्रामीण तालुक्यात ८५ रुग्ण आहेत. सुमारे ४८ लाख लोकसंख्या असलेल्या नगर जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण करोना बाधितांची संख्या २ लाख, ९६ हजार झाली आहे. आतापर्यंत २१ लाख १३ हजार चाचण्या झाल्या आहेत.
दुसऱ्या लाटेनंतर निर्बंध शिथील करताना नगरचा पॉझिटिव्हीटी रेट दहा टक्क्यांच्या आत होता. त्यामुळे तेथे जास्तीत जास्त सवलती मिळाल्या होत्या. आता तो रेट पुन्हा १४ टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे लसीकरणही पुरेशा वेगाने होताना दिसत नाही. लस घेण्यास नागरिक उत्सुक आहेत. पहाटेपासूनच केंद्राबाहेर रांगा लावल्या जात आहेत. मात्र, लस उपलब्ध नसल्याने बराच काळ लसीकरण बंद ठेवण्याचीही वेळ येत आहे. गेल्या आठवड्यापासून खासगी रुग्णालयांतही सशुल्क लसीकरण सुरू झाले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times