: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. या गुन्ह्यात माळी याला यापूर्वीच जामीन मिळाला आहे.

माळी याच्याविरोधात बातमी दिल्याच्या रागातून त्याच्या कार्यकर्त्याने पारनेर तालुक्यातील पत्रकार विजय वाघमारे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले होते. या प्रकरणी त्या कार्यकर्त्यावर गुन्हाही दाखल झाला. त्यामुळे माळी यांच्याविरुद्धचे हे जुने प्रकरणही समोर आले.

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील रोहिदास भास्कर देशमुख यांच्या मालकीची १९ एकर जमीन आहे. २०१८ मध्ये तेथे डाळींबाचा बाग होता. १ नोव्हेंबर २०१८ रोजी तेथील स्थानिक रहिवासी दगडू दुर्योधन केदारी, त्याचा मुलगा तसंच जामगांव येथील बाळासाहेब पोपट माळी यांनी जमिनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. या क्षेत्रामध्ये टाकण्यात आलेली टपरी का टाकली अशी विचारणा केली असता बाळासाहेब माळी याने दगडू दुर्योधन केदारी यांच्याकडून मी जनरल मुख्यत्यारपत्र करून घेतले आहे. प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाचा निकाल देशमुख यांच्याविरोधात गेला आहे. त्यामुळे देशमुख यांना या क्षेत्रात वहिवाट करण्याचा किंवा शेती करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर २२ नोहेंबर रोजी देशमुख यांनी माळी तसेच केदारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एकरी पाच लाख रूपयांप्रमाणे खंडणीची मागणी केली.

पैसे न दिल्यास परिणाम वाईट होतील, तुम्हाला शेतामध्ये येऊ देणार नाही. जर शेतामध्ये आले तर तुमचे हातपाय मोडून टाकू असा दमही दिला होता. डाळींब झाडे तोडून नेण्यात आल्यानंतर देशमुख पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले. तेथेही काही गुंडांनी देशमुख यांना धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे देशमुख फिर्याद न देताच घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा येऊन माळी, केदारी तसेच इतरांविरोधात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्यात अरोपींमध्ये पुष्पा माळी यांचाही समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा माळी पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. त्यामुळे त्यांना आतापर्यंत अटक झाली नव्हती.

माळी यांच्यावर अनेक गुन्हे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्याविरोधात खंडणीसह जमीन बळकावणे, गावठी कट्टे बाळगणे, बेकायदा शस्त्र विक्री करणे अशा प्रकारचे गुन्हे आहेत. माळी यांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी संदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यामुळे माळी समर्थक कार्यकर्त्याने पत्रकारास शिवीगाळ करुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आता याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here