मुंबई: राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्यानंतर झालेल्या मोठ्या मनुष्यहानी आणि वित्तहानीनंतर राज्य सरकार मदतीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने मदतीबाबत अंतिम निर्णय राज्यातील म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पूरग्रस्त भागांमधील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. मात्र पूरग्रस्त भागातील पंचनाम्यांचे काम अजूनही पूर्ण होऊ न शकल्याने सरकारकडे नुकसान किती झाले याबाबतची आकडेवारी उपलब्ध नसल्याने सरकारला मदतीचा अंतिम निर्णय घेता आलेला नाही.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दरडी कोसळून अनेक लोकांचे बळी गेले. तसेच मोठे आर्थिक नुकसानही झाले. मुसळधार पावसाचा राज्यातील एकूण १० जिल्ह्यांना फटका बसलेला आहे. हे पाहता नियमांच्या पलिकडे जाऊन पूरग्रस्त भागाला मदत करावी यावर मंत्रिमंडळाचे एकमत झाले.

विशेषत: मदत देण्याबाबत विचारविनिमय करताना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत न देता एनडीआरएफच्या निकषांच्या पलिकडे जाऊन मदत देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. एनडीआरएफच्या निकषांच्या चौकटीत बसून मदत जाहीर केल्यास पूरग्रस्तांना तुटपुंजी मदत मिळण्याची शक्यता आहे. महापूर आणि दरड कोसळून झालेले नुकसान अतिशय मोठे असल्याने एनडीआरएफचे निकष डावलून मदत दिली जावी यावर मंत्रिमंडळात एकमत झाले आहे.

महाडमध्ये एनडीआरएफचा कायमस्वरूपी बेस कॅम्प उभारणार

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एनडीआरएफचा कायमस्वरूपी बेस कॅम्प उभारला जाणार आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ही मागणीसाठी आम्ही मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रस्ताव पाठवला होता. महाडमध्ये बेस कॅम्प उभारणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील विनंती केली होती. महाडमध्ये कायमस्वरुपी एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारला गेल्यानंतर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्यात कोठेही संकट कोसळल्यास त्वरीत मदत मिळू शकेल असे तटकरे म्हणाल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here