: इफ्कोटोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क होत नाही आणि कंपनीचे प्रतिनिधी उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार कृषीमंत्री दादाजी भुसे यांना अमरावती दौऱ्यात प्राप्त झाली. याच पार्श्वभूमीवर सदर कंपनीविरुद्ध कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी कंपनीच्या कार्यालयाची प्रत्यक्ष तपासणी केली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. कंपनीचे कार्यालय सुस्थितीत कार्यान्वित न झाल्याचे तपासणीत आढळले.

पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ६५५ शेतकरी सहभागी आहेत. त्यामुळे या कंपनीने खरीप व रब्बी हंगामासाठी शासनासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, याबाबत तक्रार दाखल करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. त्यानुसार कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या कंपनीने तात्काळ जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमूण नुकसानग्रस्तांना पीक विमा मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

दरम्यान, पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी बांधवांनी नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आधी सदर माहिती कंपनीला द्यावी. संपर्कात अडथळे येत असतील तल कृषी कार्यालय, तहसील कार्यालयाला कळवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here