‘गर्दीच्या ठिकाणी करोना नियमांचे काटेकोर पालन करावं’
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करोनासंबंधी प्रभावी व्यवस्थापन करण्याची सूचना ( ) केली आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लस आणि करोनसंबंधी योग्य वर्तन या पंचसूत्रीच्या रणनीतीवर लक्ष केंद्रीत करण्यास भल्ला यांनी राज्यांना सांगितलं. पुढील काळात सण आणि उत्सव येत आहेत. यामुळे गर्दीच्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन होणं आवश्यक असल्याचं राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
‘करोनाविरोधीत लढाईत कुठलाही निष्काळजीपण नको’
करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर आर्थिक आणि इतर व्यवहार हे टप्प्या टप्प्याने सुरू केले जावेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. पण अजूनही अपेक्षेपेक्षा अधिक करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात कुठल्याही प्रकारच्या निष्काळजीला स्थान नाही. निर्बंध हटवण्याचा निर्णय हा पूर्णपणे विचार करून घेतला पाहिजे, असं केंद्रीय गृह सचिव पत्रात म्हणाले.
‘आर फॅक्टरमध्ये वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी’
भल्ला यांनी १४ जुलैला राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. आर फॅक्टरमध्ये मोठी वाढ होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. आर फॅक्टर म्हणजे एका करोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे किती नागरिकांना संसर्ग होतो, हे यात तपासले जाते. करोना व्यवस्थापनासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाला आवश्यक उपाय करण्याचे निर्देश द्यावे, असंही त्यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times