: करोना लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता महाडवासीयांपुढे पुरामुळे वाहून गेलेला संसार कसा उभा करायचा ही चिंता उभी ठाकली आहे. रोजगाराची शाश्वती असती तर मनाने हे पूरग्रस्त भक्कम राहिले असते, मात्र महाडमधील पन्नास टक्क्यांहून अधिक कुटुंबांना देणारे एमआयडीसीचे मुख्य केंद्रही चिखलात रुतल्यामुळे आता पुढे काय होणार, या भीतीने महाडवासीयांची झोप उडाली आहे.

शहरात तसेच पूरग्रस्त भागातील रहिवाशांसोबत ‘मटा’ने संवाद साधला तेव्हा अनेक कुटुंबांनी रोजगाराची चिंता व्यक्त केली. करोना संसर्गाची सुरुवात झाल्यानंतर येथील अनेक कंपन्या बंद होत्या. एमआयडीसीतील कंपन्यांमधील बहुतांश कामे ही उत्पादनाशी निगडित असल्यामुळे ऑनलाइन वा घरून काम करण्याचा पर्याय उपलब्ध नाही. कंपन्या बंद राहिलेल्या कालावधीमध्ये मोठा आर्थिक फटका लोकांना सोसावा लागला. साठवलेला पैसा लॉकडाउन कालावधीत घरखर्चासाठी तसेच करोना संसर्गाच्या उपचारामध्ये संपला. आता पुराने वाहून गेलेला संसार उभा करण्यासाठी या परिस्थितीमध्ये पैसे कुठून आणायचे हा प्रश्न स्थानिक रहिवासी रमेश भोसले यांनी उपस्थित केला. ते मागील अनेक वर्षांपासून एमआयडीसीमध्ये काम करतात. त्यांच्याही कंपनीमध्ये पाणी गेल्यामुळे कागदपत्रे वाहून गेली आहेत. या वर्षी मालकाने कंपनीचा विस्तार करण्याचे नियोजन केले होते. लॉकडाउनमुळे ते बारगळले, कर्मचारी कपात झाली. कामाचे तास वाढले, पगार कमी झाला. चिखलगाळात रुतलेली कंपनी पुन्हा सुरू होईल की नाही या चिंतेंने लोकांची झोप उडाली आहे.

औषध कंपन्यांना फटका
एमआयडीसीमध्ये अनेक औषधांच्या कंपन्या आहेत. काही स्थानिक पुरवठादार आहेत, तर काही कंपन्या औषधे निर्यात करतात. या औषध कंपन्यांनाही पुराचा फटका बसला आहे. वीज आणि पाणी नसल्यामुळे कंपन्या उत्पादन करू शकत नाहीत. लाखो रुपयांची औषधे खराब झाली आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये औषधांची निर्यात करण्यासाठी ज्या कागदपत्रांची गरज लागते ती कागदपत्रेही चिखलामध्ये रुतली आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा हा स्रोतही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही औषधांना एका ठराविक तापमानाला ठेवावे लागते, मात्र वीज नसल्यामुळे ही औषधे वाया जाणार आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल

मागील काही वर्षांमध्ये कंत्राटी पद्धतीने येथे कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे. काम केलेल्या दिवसांचा पगार त्यांना देण्यात येतो. करोनानंतर पूरस्थितीमुळे येथील अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक दिवसांचे वेतन मिळालेले नसताना आता उद्ध्वस्त झालेले संसार कसे उभे करायचे हा प्रश्न या कामगारांना सतावत आहे.

वायूगळतीची भीती

या भागामध्ये रासायनिक कंपन्याही मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाउनमुळे बंद असलेल्या या भागामध्ये या कंपन्यांमधून वायूगळती होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनती ऑरगॅनिक कारखान्यामध्ये पाच दिवसांपूर्वी आग लागली होती. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. येथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here