: शेतरस्ता वापरण्यावरुन भाऊबंदकीतील वाद उफाळून आला आणि यात चुलतभावाने आपल्या भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात पळासखेडे येथे आज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार समोर आला. जखमी झालेल्या शेतकऱ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक शिवाजी पाटील (वय ४५, रा. पळासखेडे, ता. भडगाव) हे शेतकरी जखमी आहेत.

जळगाव शहरात उपमहापौरांवर झालेल्या गोळीबारानतंर झालेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जखमी अशोक पाटील यांचे पाळसखेडे शिवारात शेत आहे. त्याच परिसरात त्यांचे नातलग असलेले विजय दोधा पाटील यांचेही शेत आहे. या शेताचा रस्ता वापरण्यावर दोन्ही कुटुंबात वाद होत होते. यातच गुरुवारी सकाळी ९.३० वाजता अशोक पाटील हे बैलगाडी घेऊन जात असताना विजय पाटील याने त्यांना अडवले. हा रस्ता माझा असून तू येथून बैलगाडी घेऊन जाऊ शकत नाही. आता बैलगाडी येथेच सोडून तू निघून जा, असा दम विजयने भरला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. क्षणातच विजय पाटील याने कमरेला खोचलेली पिस्तून काढून तीन गोळ्या झाडल्या. अशोक पाटील यांनी गोळ्या चुकवल्या. यानंतर विजय पाटील याने त्यांना मारहाण करुन जमिनीवर पाडले.

मातीत तोंड दाबून एक गोळी त्यांच्या डाव्या खांद्यावर झाडली. ही गोळी खांद्यातच रुतली. ही घटना पाहून अशोक यांचे भाऊ किशोर व आई सुशिलाबाई धावत घटनास्थळी पोहोचले. यावेळी विजय पाटील याने त्या दोघांना देखील मारहाण केली. जखमी अशोक पाटील यांना कुटुंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया करुन त्यांच्या खांद्यात रुतलेली गोळी डॉक्टरांनी बाहेर काढली. सुदैवाने या हल्ल्यात अशोक पाटील यांचे प्राण वाचले.

दरम्यान, रुग्णालयात दाखल झालेल्या अशोक पाटील यांनी संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. गोळीबार करणारा विजय पाटील हा भ्रष्टाचार आणि अन्याय, अत्याचार निर्मुलन संघटनेचा तालुका अध्यक्ष असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here