लोणावळा : म‍ावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदान ठरलेले मावळातील मुख्य धरण असलेले ८६.३४ टक्के भरल्याने गुरुवारी दुपारी चार वाजता धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून ३०१७ क्युसेसने पाण्याचा विसर्ग पात्रात सोडण्यात आला. तसंच धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असून, पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन पवना पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक शेटे यांनी केलं आहे.

यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून आणि मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गासह सर्व ठिकाणी समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तीन आठवडे पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्याने मावळातील शेतकरी वर्गासह पिंपरी-चिंचवड शहरासमोर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले होते. तसंच पावसाने अचानक विश्रांती घेतल्यामुळे भातलावणी रखडली होती.

मागील आठवड्यात पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यानंतर आठवड्यापूर्वी मावळाला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. यादरम्यानच्या चार दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली. यामुळे मावळातील मुख्य धरण असलेले पवना धरण गुरूवारी ८६.३४ टक्के भरल्याने धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उचलण्यात आले. त्यातून ३०१७ क्युसेसने पाण्याचा विसर्ग पवना नदीच्या पात्रात सोडण्यात आला.

यावर्षी आज अखेरपर्यंत पवना धरण पाणलोट क्षेत्रात १७४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी आज अखेरपर्यंत केवळ ५०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी ३० ऑगस्टला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. पवना धरण पाणलोट क्षेत्रात गुरूवारी दिवसभरात ३७ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी एक जूनपासून आजपर्यंत पवना धरणाच्या जलसाठ्यात ५५.७५ टक्के वाढ झाली आहे.

पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या वाढत्या प्रमाण व परिस्थितीनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत पावसाचे प्रमाण कायम राहणार असल्याने पवना नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here