वनाज कारशेड ते आनंदनगर मार्गावर मेट्रो धावली. पहिल्यांदा ट्रायल रन होणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सकाळची वेळ असूनही मेट्रो मार्गावर काही लोक उपस्थित होते. आज केवळ तांत्रिक चाचणी असल्यानं कुणीही गाडीतून प्रवास केला नाही. मेट्रो कोचच्या प्रतिकृतीचे अनावरण यावेळी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे एमडी ब्रीजेश दीक्षित हे यावेळी उपस्थित होते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या पाच किलोमीटर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रीजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
करोनाचे संकट असल्यामुळं पुणेकरांना त्रास होऊ नये म्हणून ट्रायल रन सकाळी लवकर घेतल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. पूर्वी कार्यक्रमांना गर्दी झाल्यामुळं संयोजकांवर गुन्हा दाखल झाले आहेत. तसे आज होऊ नये म्हणून कमीत कमी उपस्थितीत कार्यक्रम घेतला, असं पवार म्हणाले. शहरातील वाढती गर्दी, प्रदूषण, कोंडीवर मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. निवडणुकांनंतर राजकीय विचार बाजूला ठेवून विकासकामाला महत्त्व देण्याची आमची भूमिका आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झालं आहे,’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्याच्या आधुनिक इतिहासात मेट्रोची नोंद होईल, असं सांगून, मेट्रो कामादरम्यान त्रास सहन केलेल्या पुणेकरांचे अजित पवार यांनी आभार मानले.
महापालिकेनं पुढाकार घ्यावा
‘स्वारगेट ते कात्रज ओव्हरहेड मेट्रो शक्य नाही. हा प्रकल्प भूमिगतच करावा लागेल. या प्रकल्पासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा,’ असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोलीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचं उद्दिष्ट आहे, असंही पवार म्हणाले.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times