आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारे असल्याचे सांगत, ‘ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी आज, सोमवारी जाहीर होईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. ‘महाविकास आघाडी सरकार दिशाहीन सरकार आहे’, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तरे दिली. ‘महिला अत्याचाराबाबत आमचे सरकार हे संवेदनशील आहे’, असे ते म्हणाले तसेच ‘एल्गार’चा तपास काढून घेतल्याबाबत केंद्र सरकारवर नाराज असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील हेही यावेळी उपस्थित होते. ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ आज, सोमवार २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थींची यादी लावण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी २८ फेब्रुवारीपासून लावण्यात येईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
‘कर्जमाफीची योजना राबविताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येतील आणि एप्रिल २०२० अखेरपर्यंत सर्व अंमलबजावणी केली जाईल’, असे ते म्हणाले. सोमवारी ६८ गावांची यादी लावण्यात येईल आणि लाभही तत्काळ मिळतील, असेही ठाकरे यांनी जाहीर केले. आत्तापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचे आकडे समोर आले असून, त्या सर्व ३५ लाख शेतकऱ्यांची एप्रिलअखेरपर्यंत सरसकट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे, असे सांगत, ‘तत्कालीन देवेंद्र फडवणीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तब्बल साठ महिने कर्जमाफीची योजना सुरू राहिली’, असा चिमटा उद्धव यांनी फडणवीस यांना काढला. ‘महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी केवळ तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले…
-‘एल्गार’ परिषदेचा तपास मी केंद्र सरकारकडे दिलेला नाही. त्याबाबत मी नाराज आहे.
-सीएए, एनआरसीबद्दल माझी भूमिका स्पष्ट आहे. मात्र, एनआरसीबद्दल आम्ही जबाबदार मंत्र्यांची समिती नेमून चर्चा करणार.
-सावरकरांचा भाजपने मक्ता घेतलाय का? ते म्हणतील तेच हिंदुत्व काय?
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times