: ‘पूरबाधित भागात गेल्यानंतर अनेक ठिकाणी वीजबिल माफीबाबत विचारणा केली जात आहे. पण ऊर्जामंत्री असलो तरीही वीज बिल माफीचा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही, हा अधिकार मंत्रिमंडळाचा आहे. याबाबत मंत्रिमंडळ लवकरच निर्णय घेईल,’ असं आश्वासन ऊर्जामंत्री ( Reaction On ) यांनी दिलं आहे. ‘तुर्तास पूरबाधित भागातील ग्राहकांना वीज बिल दिले जाणार नाही. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत पूरबाधित ग्राहकांना वीज बिल भरावे लागणार नाही,’ असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील नऊ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सात लाख ८७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू केल्याची माहिती ऊर्जा मंत्र्यांनी दिली. ते शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शुक्रवारी सांगलीच्या दौऱ्यावर होते. सांगली शहरासह अंकलखोप, भिलवडी येथील पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. तसंच पुरामुळे महावितरणच्या झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पूरबाधित भागात गेल्यानंतर अनेक ठिकाणी वीज बिल माफीबाबत विचारणा केली जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र ऊर्जामंत्री असलो तरीही वीज बिल माफीचा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळाचा आहे. मंत्रिमंडळ याबाबत लवकरच निर्णय घेईल. तुर्तास पूरग्रस्त भागात वीज बिलांची वसुली न करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत ग्राहकांना वीज बिल देण्यात येणार नाही.

दरम्यान, पुरामुळे सांगली जिल्ह्यात ऊर्जा विभागाचे ३४ कोटी ६८ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. यात सात सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर, वीज मीटर यासह विविध उपकरणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १७ सबस्टेशन्स पुराने बाधित झाली आहेत. ६७ हजार ग्राहकांना पुराचा फटका बसला. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात नऊ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. आतापर्यंत यातील सात लाख ८७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. पूरबाधित क्षेत्रात तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मंत्री राऊत यांनी दिली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here