राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असा टोला काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. साधारणतः पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पीएचडी पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात. म्हणून मला वाटतं की, चंद्रकांत पाटील यांना थिसिस पूर्ण करण्यासाठी किमान दहा ते बारा वर्षे लागतील, असा जोरदार टोला पवार यांनी लगावला.
कॉलेज कॅम्पसमध्ये निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचं त्यांनी स्वागतच केलं. ‘लोकशाहीनं बोलण्याची आणि निवडणुका जिंकण्याची संधी आपल्याला दिली आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घेण्याच्या बाजूने मी आहे. या मुद्द्यावर आपण राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी निश्चितच बोलेन,’ असंही पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. पवार यांच्या पक्षाचे सर्वात कमी खासदार असूनही ते राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी असतात. ते एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना आपलं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळं त्यांच्यावर पीएचडी करण्याची माझी इच्छा आहे, अशी टोलेबाजी चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times