जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील शेतीच्या रस्त्याच्या वादातून काही दिवसांपूर्वी शेतकरी संजय गावंडे यांना जबर मारहाण झाली होती. या मारहाणीत संजय गावंडे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच संजय सखाराम गावंडे (वय ४५)यांचा शुक्रवारी ३० जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
शनिवारी रुग्णवाहिकेत संजय गावंडे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईकांनी भोकरदन गाठले. मयताचा भाऊ पिंटू सखाराम गावंडे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, पूर्वीच्या आरोपींसह आणखी आरोपींनी संगनमताने माझ्या भावाला मारहाण केली आहे. त्यामुळे या सर्वांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. जोपर्यंत सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे काही वेळ सिल्लोड कॉर्नरवरील मुख्य रस्त्यावर गोंधळ उडाला होता.
पोलिसांनी रुग्णवाहिका व नातेवाईकांना पोलिस ठाण्यात नेले आणि आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह कोळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी नेला.
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. सदरील प्रकरणात पाच आरोपी अटकेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times