मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगली जिल्ह्यातील पूर पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज येथे पाहणी केल्यानंतर ते सांगलीतील आयर्विन पुलावर पोहोचले. यानंतर हरभट रोडवरील व्यापाऱ्यांशी संवाद साधून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार होते. हरभट रोडवर पोहोचताच त्यांनी व्यापाऱ्यांची निवेदने स्वीकारण्यास सुरुवात केली. याच वेळी बाजुला थांबलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री निवेदने स्वीकारत नसल्याचा आरोप करीत त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडला.
अचानक गोंधळ सुरू झाल्याने मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने शिवसैनिक आक्रमक बनले. भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्याकडे चालून जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच अडवले. सुमारे पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना हरभट रोडवरून दुसरीकडे जाण्याचे आवाहन केले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हरभट रोडवरच ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरू ठेवली होती. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या दौऱ्याला गालबोट लावण्याचे काम भाजपचा कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. मुद्दाम दौर्यात शिरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times