: बँकेतून पैसे काढून दुचाकीवरून घरी निघालेल्या व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग भररस्त्यात चोरट्यांनी हिसकावली. ही बॅग घेऊन पळून जाताना ते पोलिस ठाण्यासमोरूनच भरधाव वेगाने गेले. नगर शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर भर दुपारी बॅग हिसकावणे आणि पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावरून पळून जाण्याचे धाडस चोरट्यांनी दाखवलं आहे.

व्यावसायिक किशोर अमृतलाल पोखरणा यांनी सावेडीतील नगर-मनमाड रोडवरील स्टेट बँकेच्या शाखेतून पाच लाख रुपये काढले. पैसे बॅगेत ठेवून ते घराकडे निघाले होते. प्रेमदान चौकातून ते प्रोफेसर कॉलनीकडे वळाले. तेथून पुढे दत्त मंदिरासमोरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोखरणा यांच्याकडील बॅग हिसकावली. झटका बसल्याने तोल जाऊन पोखरणा खाली पडले. त्याचा फायदा घेत चोरटे प्रोफेसर कॉलनी चौकाच्या दिशेने गेले. तेथून जवळच आकाशवाणी केंद्रासमोर असलेल्या तोफखाना पोलिस ठाण्याच्या समोरून भरधाव वेगाने चोरटे निघून गेले.

गुन्हा घडल्याचे ठिकाण पोलिस ठाण्यापासून जवळच आहे. शिवाय हा रस्ता वर्दळीचा असतो. घटना घडली त्यावेळीही तेथे वर्दळ होती. बॅग हिसकावल्यानंतर नागरिक पाठलाग करतील, धावपळ होईल, पोलिस येतील अशी शक्यता असूनही चोरट्यांनी पोलिस ठाण्याच्यासमोरून जाणारा रस्ता निवडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चोरट्यांनी बँकेजवळ थांबून पाळत ठेवून हा गुन्हा केला असल्याचा संशय आहे. धाडस पाहून चोरटे सराईत असल्याचाही अंदाज आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळतात शहर विभागाचे डीवायएसपी विशाल ढुमे, तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, किरण सुरसे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. पोलिसांनी बँकेतील आणि त्या रस्त्यावरील सीसीटीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. बँकसमोरील आणि त्या रस्त्यावरील काही दुकानांतून त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोखरणा आणि नागरिकांच्या मदतीने चोरट्यांची ओळख पटविण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here