म. टा. प्रतिनिधी, नगरः नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने गहाण ठेवून सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी १५९ कर्जदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय हे सोने खरे असल्याचे प्रमाणपत्र देणारा सराफ विशाल गणेश दहिवाळकर यांच्याविरूद आणि कटात सामील असलेल्या संबंधितांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ मध्ये हे कर्ज वाटप झाले होते. त्याची परतफेड न केल्याने जून २०२१ मध्ये गहाण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. शाखाधिकारी अनिल वासुमल आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन शाखाधिकाऱ्याने गेल्याच आठवड्यात आत्महत्या केली आहे.

फिर्यादित म्हटले आहे की, २०१७ मध्ये हे कर्जवाटप झाले होते. मात्र संबंधितांना परतफेड न केल्याने जून २०२१ मध्ये या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला. त्यावेळी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या पिशव्यांची पाहणी करण्यात आली. त्यातील ५ पिशव्यांची तपासणी बँकेचे नियुक्त गोल्ड व्हॅल्युअर कृष्णा डहाळे यांनी केली असता त्यामध्ये नकली सोने असल्याचे आढळून आले. त्यामुळे लिलाव थांबवून इतरही पिशव्यांची तपासणी केली असता त्यातील १५९ कर्जदारांनी ठेवलेले सोने नकली असल्याचे आढळून आले. त्यांची किमत शून्य असल्याचा अहवाल डहाळे यांनी दिला.

शेवगाव शाखेत ३६४ सोने तारण पिशव्यांपैकी २० सोने तारण पिशव्यांमधील काही दागीने सोन्याचे असल्याचे निष्पन्न झाले. बाकीच्या पिशव्यांमध्ये नकली सोने आहे. ते गहाण ठेवून १५९ जणांनी ५ कोटी, ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे हे , त्यांनी ठेवलेले सोने नकील असल्याचे माहिती असून खरे असल्याचा अहवाल देणारे गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर तसेच त्यांना सहकार्य करणारे इतर सर्व लोकांनी संगनमत करून बँकेची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. बँकेला नकली सोने देऊन कर्ज घेतले आणि त्याची परतफेड केली नाही, म्हणून या सर्वांविरूद्ध शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अर्बन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून यापूर्वीच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जुन्या संचालकमंडळाच्या कारभाराबद्दल अनेक तक्रारी आहेत. त्यापैकी शेवगावचेही प्रकरण होते. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी त्या काळात बँकेचे अध्यक्ष होते. दुदैर्वाने त्यांचे काही महिन्यांपूवीच निधन झाले आहे. तर या प्रकाराची चौकशी सुरू असताना बँकेच्या शाखाधिकाऱ्याने विष प्रशासन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली होती. आता गुन्हा दाखल झाल्याने या कटात कोण कोण सहभागी होते, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here