पुणे महापालिकेची सत्ता सध्या भाजपच्या हातात आहे. ही सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोस्टर युद्धही रंगलं होतं. पुण्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं पोस्टर भाजपकडून लावण्यात आलं. त्याला राष्ट्रवादीनं अजित पवार यांचं पोस्टर लावून उत्तर दिलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुण्यातील प्रश्नांमध्ये जातीनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे. पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ नुकतीच अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली. त्या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना आमंत्रण नसल्यामुळं राजकारण रंगलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘पुणे मेट्रोला मंजुरी नरेंद्र मोदींनी दिली, ११ हजार कोटींचा निधी फडणवीसांनी आणला आणि ट्रायल रनला अजित पवार होते,’ असा खोचक टोला पाटील यांनी हाणला होता.
पाटील यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. अजित पवारांनी पुण्याची वाट लावल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. ‘ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, ते बघता पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे अर्थतज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही,’ अशी टीका नीलेश राणेंनी केलीय.
नीलेश राणे यांनी यापूर्वी राज्यातील साखर कारखानदारीच्या मुद्द्यावरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता त्यांनी अजितदादांना लक्ष्य केलं आहे. त्याला राष्ट्रवादी काय उत्तर देते याबद्दल उत्सुकता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times