मुंबई: साहेब, कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. त्यामुळं आता मुलीच्या लग्नाची चिंता मिटली. तुम्हीही लग्नाला या!..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातील विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलं. तर पहिल्यांदा कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही, अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. या दोन्ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यशस्वी अमंलबजावणीचे यश अधोरेखित करणाऱ्या ठरल्या.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.

हेलपाटे वाचले

या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले? किती कर्ज होते? कुठल्या पीकासाठी कर्ज घेतले होते? आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला, असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना ‘मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या, आता केवळ एका थम्बवरच काम झाले’, असे त्यांनी सांगितले.

लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छा

परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठल गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्यानं चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीच लग्न जमलयं अशी आनंदाची बातमी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठं दिलं, अशी आपुलकीनं विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरकून गेलेल्या गरूड यांनी त्यांना मुलीच्या लग्नाचे निमंत्रणही दिले.

योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला: मुख्यमंत्री

राज्यातील बळीराजाला कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसांत झाली, असे सांगून याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ही योजना राबवताना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत, अशी भावना ठेवू नका. शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत. त्यामुळे आपण लाभार्थी आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही ठिकाणी अमंलबजावणी करताना उणिवा जाणवल्या, तर शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संमय ढळू देऊ नका. बळीराजाला दुखवू नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली. ‘बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्य सरकारनं ही महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकरी आनंदात रहावा, त्याच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आमची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here