म. टा. प्रतिनिधी,

उशिरापर्यंत सुरू असलेला पाऊस, त्यामुळे लसणाच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी झालेली वाढ यामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात लसणाची गेल्या पंधरा दिवसांत वाढलेली आवक यामुळे लसणाच्या १० किलोच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी १६०० रुपये असलेले दर आता ५०० ते १००० रुपयांपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

मार्केट यार्डातील लसणाचे व्यापारी मनोज देवढे म्हणाले, ‘यंदा पावसाचा मुक्काम उशिरापर्यंत लांबला होता. त्यामुळे लसणाच्या दरवर्षीच्या तुलनेत उत्पादनात २५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे उशिरापर्यंत लसणाचा हंगाम सुरू राहिला. परिणामी, लसणाची आवक वाढल्याने त्याचा लसणाच्या दरावर परिणाम झाला आहे. सोमवारी १० किलो लसणाला ५०० ते १००० रुपये दर मिळाला. पंधरा दिवसांपूर्वी हाच दर एक हजार ते सोळाशे रुपयांपर्यंत होता. आवक वाढल्याने लसणाच्या दरात सुमारे ४० ते ५० टक्के घट झाली आहे.’

सध्या मार्केट यार्डात मध्य प्रदेशातून लसणाची मोठी आवक होत आहे. पंधरा दिवसांपासून ही आवक सुरू झाली असून, ती मार्चअखेरपर्यंत सुरू राहील. त्या दरम्यान उत्तर प्रदेशातून ही लसणाची आवक होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. लसणाला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी अपरिपक्व लसूण बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या लसणाला मागणी आहे. तर चांगल्या प्रतीच्या लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे, असेही सांगण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here