: जातपंचायतीच्या सामाजिक बहिष्काराचा आणखी एक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. गोंधळी समाजातील शरणीदास भोसले यास तीन वर्षापासून समाजातून वाळीत टाकून त्याचे प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाखाची मागणी केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जातपंचायतीच्या चार पंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंधळी समाजातील शरणीदास भोसले यास त्याच्याच गोंधळी समाजाने तीन वर्षापासून समाजातून वाळीत टाकलं असून हेच प्रकरण मिटवण्यासाठी दोन लाखाची मागणीही केली आहे. सांगली येथे राहणाऱ्या शरणीदास पांडुरंग भोसले याचे आपल्या पत्नीबरोबर चार वर्षांपूर्वी घरगुती कारणावरून भांडण सुरु होते. हा वाद सोलापुरातील गोंधळी वस्तीतील गोंधळी समाज पंचांच्या पंचायतीसमोर मांडण्यात आला. यावेळी पंचांनी योग्य तो न्याय न करता उलट माझ्यावर अन्याय केला, अशी तक्रार भोसले यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली.

‘हे प्रकरण मिटवतो आणि तुझ्या पत्नीस नांदायला पाठवतो, आम्हाला दोन लाख रुपये दे,’ अशी मागणी गोंधळी समाजाचे पंच राम धोडिंबा शिंदे -पाटील, अशोक शिंदे-पाटील, नाना शिंदे-पाटील, संतोष राम शिंदे, उत्तम शिंदे यांनी केल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.

याप्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस सब इन्स्पेक्टर माळी हे करत आहेत.

दरम्यान, समाजातील विषमता दूर व्हावी, अनिष्ट रूढी परंपरा नष्ट होऊन माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी, यासाठी शासनाने अनेक कायदे केले. परंतु याची खरंच अंमलबजावणी होते का? हा प्रश्न सोलापूरमधील या घटनेनं उपस्थित झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी आगामी काळात काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here