भोपाळः मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुर असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंध नदीच्या पुरामुळे दतियामध्ये पूरस्थिती आहे. या पूरस्थितीत नागरिकांच्या बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री ( mp home minister ) स्वतः पूरग्रस्त भागात गेले. पण ते पुराच्या पाण्यात अडकले. यानंतर त्यांना हवाई दलाच्या ( ) हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात आलं. नरोत्तम मिश्रा हे या भागाचे आमदार आहेत.

नरोत्तम मिश्रा हे एनडीआरएफच्या मोटर बोटद्वारे लाइफ जॅकेट घालून पूरग्रस्त दतियामधील कोटरा गावात पोहोचले होते. इथे त्यांनी काही नागरिकांना पुराच्या पाण्यात अडकल्याचं पाहिलं. नरोत्तम मिश्रा स्वतः घराच्या छतावर गेले. एसडीआरएफने अडकलेल्या सर्व नागरिकांना पुरातून बाहेर काढलं. पण गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे स्वतः पुरात अडकले.

नरोत्तम हे निघत असताना त्यांच्या बोटीवर झाड कोसळलं. यामुळे त्यांच्या बोटीची मोटर बंद पडली, असं सांगण्या येतंय. तर पाण्याचा वेग प्रचंड असल्याने मोटर बोट पुढे जात नव्हती, असंही सांगितलं जातंय. पण यामुळे नरोत्तम मिश्रा हे बराच वेळ पुराच्या पाण्यात अडकून होते. अखेर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांना बाहेर काढण्यात आलं. गृहमंत्री मिश्रा यांना बाहेर काढण्यापूर्वी ४ गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे दतिया आणि डबरामधील पूरग्रस्त भागाची हवाई आणि बोटीद्वारे पाहणी करत होते. दतियातील नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

सिंध नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे. लष्कर आणि हवाई दलाकडून पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.

शिवपुरी धरणातून पाणी सोडल्याने नदीला पूर

मुसळधार पावसामुळे शिवपुरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी सिंध नदीत सोडले जात असल्याने नदीला मोठा पूर आला आहे. नदीच्या पुरामुळे रतनगढ माता मंदिराजवळ असलेला पूल वाहून गेला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here