संवेदनशील ठिकाणांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्याच्या सूचना रेड्डी यांनी पोलिसांना दिल्या. तसंच गुप्तचर विभागाच्या पथकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जाणूनबुजून नागरिकांना चिथावण्याचा प्रयत्न केला गेलाय, असं रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण विरोधाच्या नावाखाली दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांची हत्या करणं हे लोकशाही विरोधी आहे. सरकार हे खपवून घेणार नाही. गृहमंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशाची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचला गेलाय, असं रेड्डी म्हणाले.
अमित शाहांनी बोलावली तातडीची बैठक
ईशान्य दिल्लीतील जाफराबादमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी उच्चस्तरीय पातळीवर विचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तातडीची बैठक घेतली. तर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय गृहसचिव ए. के. बल्ला यांनी सांगितलं. शांतता राखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सर्व आवश्यक उपायांवर त्यांनी समाधान व्यक्त केलं. अमेरिकेचे अध्यक्ष आजची रात्र दिल्लीत आहेत. यामुळे दिल्लीची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. कुठल्याही परिस्थितीत हिंसाचारावर नियंत्रण आणून शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश शहा यांनी गृहसचिव ए. के. भल्ला, नायब राज्यपाल अनिल बैजल आणि दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना दिलेत.
दिल्लीतील ९ भागांना छावणीचं स्वरूप
मौजपूर, जाफराबाद, सीलमपूर, गौतमपुरी, भजनपुरा, चांदबाग, मुस्तफाबाद, वजीराबाद आणि शिव विहार या ९ संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणार बंदोबस्त तैनात केला गेला आहे. या भागांना छावणीचं स्वरूप आलंय. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस संचलन करत आहेत. तसंच छोट्या सभा घेऊन पोलीस नागरिकांना शांततेचं आवाहन करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश गोलचा यांनी दिली.
दरम्यान, सीएएविरोधातील आंदोलनात गोळीबार करणाऱ्याची ओळख पटलीय. शाहरूख असं त्याचं नाव आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times