पुणे: ‘आजकाल चलती कोणाची याची स्पर्धा लागली आहे. संगीतात आता केवळ सर्टिफिकेट घेण्याचे दिवस आले आहेत. स्वतःला गुरू म्हणवून घेऊन लोक दुकाने उघडू लागले आहेत,’ अशी टीका तालयोगी पं. यांनी सोमवारी केली. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटामध्ये चार गाणी गाऊन महेश काळे मोठे झाले. हा काळाचा महिमा आहे, अशा शब्दांत त्यांनी महेश काळे यांना फ्युजनवरून सुरू असलेल्या वादावरून टोला लगावला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात तळवलकर बोलत होते. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तळवलकर म्हणाले, ‘संगीत विद्या म्हणून शिकावी आणि कला म्हणून सादर करावी. मात्र आधी संगीताचे संस्कार झाले पाहिजेत. गुरूने दाखवलेल्या वाटेवरून शिष्य चालतोय की नाही हे समजून घेण्याचे दिवस आहेत. स्वतःला आणि विद्यार्थ्यांना तपासण्याचे दिवस आहेत.’

ते पुढे म्हणाले, ‘पखवजपासून तबला आला हे माझे वैयक्तिक मत आहे. तबला हा संशोधनाचा विषय आहे. वाद्यांचा उगम कुठून झाला हे शोधण्यासाठी खूप मागे जावे लागेल. त्यासाठी संदर्भ तपासून घेतले पाहिजेत. प्राचीन विचार आताच्या काळाच्या कसोटीवर तपासण्याची गरज आहे. साहित्य, तंत्र, सादरीकरण यातून तावून सुलाखून निघते ती घराण्याची शैली असते. प्रत्येक घराणे वेगळा विचार देते. प्रेरणेचे मोल गुरूंनी शिकवले. गुरू केवळ संगीत शिकवत नाहीत, तर विचार देतात. वाजते ते सगळे चांगलेच असते असे नाही. लय हा संगीताचा महत्त्वाचा घटक आहे. तबल्याशिवाय संगीत अपूर्ण आहे. पूर्वीच्या काळी संगीत हेच गुरूंचे आयुष्य होते. ते संगीत शब्दशः जगायचे. बंदिश हे मूर्त तर गायकी हे अमूर्त स्वरूप आहे. अमूर्त गोष्ट मूर्त स्वरूप घेते, तेव्हा कलाकार पुढील अमूर्तचा शोध घेतो.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here