: जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाला आज गुरुवारी प्राप्त झालेल्या करोना अहवालात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. २२ मे २०२० नतंर अर्थात १५ महिन्यानंतर प्रथमच जळगाव जिल्ह्यात नवीन बाधित रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. हा जळगाव जिल्ह्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्याही ५६ पर्यंत खाली आली आहे, तर आठ तालुक्यांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या शून्य आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी आजचा गुरुवारचा दिवस तब्बल १५ महिन्यानतंर दिलासा देणारा ठरला आहे. दैनंदिन करोना अहवालांमध्ये आज जळगाव जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच जिल्ह्यात एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात ३ हजार ४८ अहवाल तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील २७२ अहवाल प्रलंबित आहेत. तर उर्वरीत सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या १२ हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र करोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी प्रशासनाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवून करोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळवलं आहे. प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजारपर्यंत गेलेली सक्रिय रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून ती आता ५६ पर्यंत खाली आली आहे.

दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणची सक्रिय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती तर उर्वरित तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहोचली होती. सध्या जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सात तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली आहे, तर इतर तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सातच्या आत आली आहे. एकमेव चाळीसगाव तालुक्यात ही रुग्ण संख्या २६ इतकी आहे. सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती शल्यचिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

तालुकानिहाय रुग्णांची संख्या
जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, बोदवड, यावल व भडगाव या आठ तालुक्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे. जळगाव शहर-७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-४, अमळनेर-४, चोपडा-६, पाचोरा-२, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-४ असे एकूण ५६ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी २५ रुग्ण लक्षणे असलेले तर ३१ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. यातील ७ रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत असून ५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here