मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागले असतानाच तेथील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे कँडल मार्च काढण्यास पोलिसांनी अटकाव केला आहे. गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, निदर्शकांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राइव्ह गाठत कँडलसह ठिय्या दिला आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे याआधीही सीएए समर्थनार्थ आंदोलन झाले होते. आंदोलनाला एका दिवसाची परवानगी असताना जवळपास तीन दिवस आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडला होता. त्यामुळेच यावेळी मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून बॅरिकेड्स लावून वाट बंद करण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना आधीच रोखले जात आहे.

…तर अटक करणार

याबाबत पोलिसांनी निदर्शकांना सख्त ताकीद दिली आहे. आझाद मैदान ही जागा निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. त्याशिवाय अन्यत्र शहरात कुठेही बेकायदेशीरपणे गर्दी केल्यास संबंधितांवर अटकेची कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

काय घडलं दिल्लीत?

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला आज दिल्लीत हिंसक वळण लागलं. दिल्लीत ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या हिंसक आंदोलनात दिल्ली पोलीस दलातील एक हेडकॉन्स्टेबलला प्राण गमवावे लागले तर पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस जखमी झाले आहेत. दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यात कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत. तसंच दोन नागरिकांचाही हिंसाचारात मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे हिंसाचारातील मृतांची संख्या तीनवर गेलीय. दिल्लीच्या जाफराबादमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमा झालेत. आंदोलकांनी नेमौजपूर भागात दोन घरंही पेटवली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. जाफराबादमध्ये तणावाची स्थिती आहे. इथे एक आंदोलक खुलेआम रस्त्यावर गोलीबार करताना दिसून आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here