ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी राहुल दिलीप पाटील यांना बुधवारी रात्री साडेदहा वाजता आमदार लंके यांनी घरून बोलावून घेतलं आणि मारहाण केली असा आरोप करण्यात आला होता. गटविकास अधिकारी किशोर माने आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासमोरच ही घटना घडल्याचा दावाही करण्यात आला. याआधारे कोणतीही शहानिशा न करता आमदारांनी पाटील यांना मारहाण केल्याच्या घटनेसंबंधी कार्यवाही व्हावी, असे पत्र पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले होते.
आरोग्य कर्मचाऱ्याच्या खुलाशाने चित्र पालटले!
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पाठवलेलं हे पत्र व्हायरल झाले. त्यानुसार बातम्याही प्रकाशित झाले. आता संबंधित कर्मचाऱ्याने याबाबत खुलासा केला आहे. आपल्याला मारहाण झाली नसल्याचं त्याने म्हटलं आहे. राजकीय मंडळी आणि पत्रकारांचे फोन आल्याने घाबरून आपण मारहाण झाल्याचं सांगितल्याचं पाटील यांनी आता म्हटले आहे. त्यामुळे यासंबंधी पत्रव्यवहार करणारे आरोग्य अधिकारीही तोंडावर पडले आहेत. या घटनेला आता राजकीय वळण मिळाले आहे.
पाटील यांनी खुलासा करताना म्हटलं आहे की, ‘त्या दिवशी रात्री लसीकरण केंद्रावर टोकन वाटपावरून गोंधळ सुरू होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपल्याला तेथे बोलावून घेतले. गोंधळाबाबत कोणत्यातरी तकारीवरून शहानिशा करण्यासाठी आमदार लंके तेथे आले होते. त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना गोंधळाबाबत जाब विचारला. त्यानंतर झाल्या प्रकाराबाबत आमदार व गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या समक्ष पंचनामा झाला. या घटनेबाबत डॉ. उंद्रे यांनी माफी मागितली आणि त्यानंतर आमदार साहेब तेथून निघून गेले,’ असं राहुल पाटील याने खुलासा करताना म्हटलं आहे.
‘दुसऱ्या दिवशी तालुक्यातील काही राजकीय मंडळी रुग्णालयात आली. त्यांनी काही पत्रकारांना माझा फोन नंबर देऊन आमदार लंके यांनी मारहाण केल्याचे व शिवीगाळ केल्याचे बोल असे सांगितले. दबावापोटी मी घाबरलो व त्यांनी सांगितले त्याप्रमाणे बोललो. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या पोस्ट चुकीच्या व माझ्या बदनामी करणाऱ्या आहेत. यासंबंधी चुकीची व खोटी माहिती देणाऱ्यांविरुद्ध मी रीतसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केलेला आहे,’ असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times