केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लीवरून पाठवलेल्या पथकाने गुरुवारी बेलसर येथे भेट दिली. तेथील झिकाच्या रुग्ण आढळलेल्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधला. त्याशिवाय गावातील उपाययोजनांची पाहणी करून त्याबाबत स्थानिक प्रशासनाची मते जाणून घेतली. तसेच स्थानिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून उपाययोजनांची तयारी जाणून घेतली.
दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेतील कीटकतज्ज्ञ डॉ. हिंमत सिंग, नवी दिल्लीच्या लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा.डॉ. शिल्पी नैन तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम, आरोग्य विभागाचे मुख्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अजय बेंद्रे आदींनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांनी केंद्रीय पथकाची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली.
‘आरोग्य विभागाने बेलसर येथे केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावेळी उपाययोजनांबाबत पथकाने समाधान व्यक्त केले. मात्र, सध्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आणखी वाढ करा. या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यासाठी कीटक नियंत्रण करण्याच्या सूचना पथकाने आम्हाला दिल्या आहेत,’ अशी माहिती मुख्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times