मराठीसह २३ भाषांमधील अनुवादकांना २०१९ या वर्षासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्लीतील रविंद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध २३ पुस्तकांची २०१९ साठीच्या अनुवाद पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यावर कार्यकारी मंडळाने शिक्कामोर्तब केले.
पुस्तकांची निवड त्या त्या भाषांतील त्रिसदस्यीय समितीने केली. मराठी भाषेसाठीच्या निवड समितीत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता. या समितीने ‘आणि मग एक दिवस’ हे पुस्तक मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून आपला कौल दिला. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी पुरस्कारांचा तपशील जाहीर केला. ५० हजार रुपये रोख आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अस्लम मिर्झा यांनाही पुरस्कार
औरंगाबाद येथील विख्यात कवी, लेखक, अनुवादक अस्लम मिर्झा यांनाही अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीतील कवी प्रशांत असणारे यांच्या ‘मीच माझा मोर’ या कविता संग्रहाचा उर्दू अनुवाद असलेल्या ‘मोरपंख’ या कविता संग्रहासाठी मिर्झा यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times