केंद्राच तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भेटत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला. कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत. चर्चा करून काहीही उपयोग नाही. हे काळे कायदे आहेत, ते रद्द झालेच पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधींना खेलरत्न पुरस्कारांचे नाव बदलल्यावरून प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावर माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देताच राहुल गांधी निघून गेले.
मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल सन्मान व्यक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करते. मेजर ध्यानचंद हे ना भूतो ना भविष्यती, असे खेळाडू होते. हॉकीचे जादूगर हे नाव त्यांना फक्त देशानेच नव्हे तर जगाने दिले होते, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
मेजर ध्यानचंद यांच्या नावाचा उपयोग पंतप्रधान मोदी आणि भाजपने आपल्या संकुचित राजकीय उद्देशासाठी केला नसता तर बरं झालं असतं. पण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले. राजीव गांधी हे कुठल्या पुरस्काराने नव्हे तर आपल्या हौतात्म्याने आणि विचारांनी ओळखले जातात. आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांची ओळख आहे. राजीव गांधी या देशाचे नायक होते आणि राहतील, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी आज एक ट्वीट करून मोठी घोषणा केली. ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चं नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ केल्याचं त्यांनी या ट्वीटमधून सांगितलं. पुरस्काराचे नाव बदलण्याची मागणी जनतेतून करण्यात येत होती. यामुळे नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे करण्यात आले आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times