अमेरिकेतील अभ्यासात गंभीर निष्कर्ष

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

दारूच्या जाहिराती नजरेस पडल्यामुळे किशोरवयीन मुलांचा याबाबतचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि परिणामी ती दारूच्या व्यसनाकडे वळू शकतात, असा गंभीर निष्कर्ष अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांचा समावेश असलेल्या एका पथकाने काढला आहे. या अभ्यासामुळे दूरचित्रवाणीवरील मद्य उत्पादनांच्या जाहिरातींबाबत नवीन, अधिक कडक धोरण आखण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

‘जर्नल ऑफ स्टडीज ऑन अल्कोहोल अँड ड्रग्ज’ या नियतकालिकात हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. तंबाखूच्या जाहिराती आणि तरुणांमधील धूम्रपान यांतील परस्परसंबंध दर्शवणारी कारणे दारूच्या जाहिरातींना लागू करून हा अभ्यास करण्यात आला.

या पथकातील संशोधकांच्या मते, तरुणांवर जाहिरातींचा मोठा प्रभाव पडतो. एखाद्या ब्रँडसोबत जोडले जाण्याची प्रक्रिया या लहान वयातच सुरू होते, हे याचे महत्त्वाचे कारण. तसेच या वयात कोणतीही बाब तपासून न घेण्याची वृत्ती आणि सोशल मीडियाचा अधिक वापर हे घटकही यास कारणीभूत ठरतात. मद्य उत्पादनांच्या जाहिरातींसाठी सोशल मीडियाचा मोठा वापर केला जातो.

किशोरवयीनांमधील मद्यसेवन ही आज सार्वजनिक आरोग्याची सर्वात मोठी समस्या ठरली आहे. यामुळे दुखापत, वाहनांचे अपघात, धोकादायक लैंगिक वर्तन या गंभीर दुष्परिणामांसह मेंदूची वाढही खुंटते. त्यामुळे यावर तातडीच्या उपाययोजनांची गरज या अभ्यासाने अधोरेखित झाली आहे.

तंबाखू व दारूच्या कंपन्या मुलांमध्ये सुपरिचित असलेल्या व मुलांचा विश्वास असलेल्या शुभंकरांचा आपल्या जाहिरातींमध्ये वापर करतात. तसेच चित्रपट, टीव्ही आणि क्रीडास्पर्धांसारख्या संधींचा जाहिरातबाजीसाठी उपयोग करतात, याकडेही या अभ्यासात लक्ष वेधण्यात आले आहे.

शाळांजवळ दारूविक्रीबाबत चिंता

तंबाखूविक्रीची दुकाने अधिक असलेल्या भागात मुलांवर या जाहिरातींचा अधिक मारा होतो, पर्यायाने मुले ही उत्पादने खरेदी करण्याकडे वळतात. हेच दारूच्या बाबतीत लागू होते, याकडे या अभ्यासाने लक्ष वेधले. विशेषत: शाळांच्या जवळ तंबाखू व दारू विक्री करणारी दुकाने असल्याबद्दलही अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here