महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतल्याने अमित शहांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास ४ वेळा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या भेटी घेतल्या. आशिष शेलारही दिल्लीत जाऊन भेटले. आता चंद्रकांत पाटील हे शनिवारपासून ४ दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तेही अमित शहांना भेटणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय.
दरम्यान, फडणवीस आणि शेलार यांच्या दिल्ली भेटीबाबत गुप्तता बाळगली जात आहे, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगितलं जात आहे. या भेटी मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याने भाजप-मनसे युतीबाबत चर्चा रंगली आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह इतरही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. यामुळेच दिल्लीत आता वरिष्ठ नेतृत्वाकडून पुढील दिशा ठरवण्यासाठी चाचपणी करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times