शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सामना वृत्तपत्रातून तेजस ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांना वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज व्हिव्हियन रिचर्डस् यांची उपमा दिली आहे. ‘ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, असा मजकूर सामना वृत्तपत्रात देण्यात आला आहे.
तेजस ठाकरे हे सक्रीय राजकारणापासून नेहमीच अलिप्त राहिले आहेत. त्यामुळं ते राजकारणात उतरणार का?, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तसंच, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री युवासेनेचे प्रमुखपद सोडणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांच्याकडे कोणती मोठी जबाबदारी देण्यात येणार का?, त्यादृष्टीने या जाहिरातीकडे पाहिलं जातं आहे.
दरम्यान, तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा मात्र मिलिंद नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत. ठाकरे कुटुंबात तेजस ठाकरे आक्रमक आहेत म्हणून त्यांचा उल्लेख व्हिव्हियन रिचर्डस् म्हणून केला आहे. तर, आदित्य ठाकरे हे सुनील गावस्कर प्रमाणे संयमी आहेत, असंही मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अद्याप तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रचारादरम्यान त्यांनी सभांना हजेरी लावली होती. तेव्हापासून तेसुद्धा राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरेंनी तेजस हा जंगलात रमणारा माणूस आहे, असं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times