मुंबई: भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री आज तरी जाताना दिसत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी विरोधी बाकावरील ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल?; असा सूचक इशारा देतानाच विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा, असा खोचक सल्लाही शिवसेनेने विरोधी पक्षनेते यांना दिला आहे.

महाविकास आघाडीत संवाद नाही. त्यामुळे त्यांनीच आपआपसात संवाद साधावा, अशी टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्याचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे १०५ आमदार आहेत. बाकी इतर कुणी त्यांच्याबरोबर आहेत असे दिसत नाही. या १०५ मध्येही किमान ५० असे आहेत की, ते विचाराने ‘उपरे’ आहेत व विरोधी पक्षात राहून काम करण्याची त्यांची भूमिका नाही. भाजपने सत्तेचा गैरवाजवी वापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत. त्यांनी विरोधी बाकावरील ‘१०५’ लोकांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल?, असा इशारा देतानाच नागपुरात संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एक हवाबाज विधान केले. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची ‘माजी’ ही बिरुदावली लवकरच जाईल. या विधानामुळे विरोधी पक्षांना मानसिक गुदगुल्या झाल्या असतीलही, पण महाराष्ट्रात असे काही घडणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकेच आम्ही सुचवू शकतो!, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

>> फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा भूषवले आहे. एकदा पाच वर्षे व दुसऱ्यांदा ८० तास. त्या ८० तासांचा अनुभव महत्त्वाचा ठरतो, कारण ८० तासांत राष्ट्रपती भवन, राजभवन, गृहमंत्रालय, ईडी, सीबीआय यांच्यामार्फत ‘संवाद’ साधूनही महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे.

>> विरोधी पक्षाने चहापान कार्यक्रमात हजेरी लावून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला हवा होता. राज्याच्या हिताच्या काही सूचना करता आल्या असत्या. शेतकरी, कष्टकरी अशा प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायला काहीच हरकत नव्हती, पण विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा आडमुठे धोरण स्वीकारले. विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरील बहिष्काराचे समर्थन करताना जो युक्तिवाद केला तो बिनबुडाचा आहे.

>> विरोधी पक्षनेत्याने संसदीय लोकशाहीच्या परंपरा राखून काम केले तर तो ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो व मुख्यमंत्र्यांइतकेच विरोधी पक्ष नेत्याकडे प्रश्न व माहिती घेऊन लोक तसेच अधिकारी येत-जात असतात, पण फडणवीस या कामात अपयशी होताना दिसत आहेत. त्यांच्याकडे अर्धवट माहिती आहे. मुळात महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये उत्तम परस्पर संवाद आहे आणि कोणत्याही परिस्थितीत विसंवाद होणार नाही याची खात्री महाराष्ट्राला आहे.

>> आघाडीतील सर्व घटक पक्ष सरकार चालवणे व टिकवणे या भूमिकेवर ठाम आहेत. आता हीच जर विरोधी पक्षनेत्यांची पोटदुखी असेल तर आमचा नाइलाज आहे. महाविकास आघाडीत भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र आले हादेखील एक संवादच आहे, पण भारतीय जनता पक्षाबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पंचवीस वर्षे साथ देणाऱया शिवसेनेशी तुमचा संवाद का तुटला याचे उत्तर महाराष्ट्राला द्या. संवादाचे धोरण नीट राबवले असते तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र वेगळे दिसले असते. त्यामुळे संवाद कौशल्याचे धडे फडणवीस यांनी महाविकास आघाडीस द्यायची गरज नाही. संवाद कौशल्याबाबतचे एक शिबीर रामभाऊ म्हाळगी संस्थेत ठेवून त्यात भाजपातील अनेक नेत्यांनी सहभागी व्हावे, असे एकंदरीत वातावरण आहे. विरोधी पक्षांची सध्या जी धोपटशाही सुरू आहे तोच त्यांचा ‘संवाद’ असेल तर ईश्वर त्यांचे रक्षण करो! विधिमंडळात सरकारला काम करू देणार नाही, असा धोपटमार्ग देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here