म. टा. प्रतिनिधी । सांगली

महापुराने मोठे नुकसान झाल्यामुळे पूरबाधितांना सध्या वीजबिले पाठवली जाणार नाहीत. परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत वीज बिलांच्या वसुलीला स्थगिती दिल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. घोषणेनंतर आठवडाभरातच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याला हरताळ फासला आहे. सांगली जिल्ह्यातील पूरबाधितांना वीज बिले पाठवल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. सरकारकडून अजूनही मदत मिळालेली नाही. यातच एटीएम आणि बँकांचे पासबुक पुरात भिजल्याने वीज बिल भरायचे कसे? असा सवाल विचारला जात आहे.

महापूर ओसरताच ३० जुलै रोजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. काही पूरग्रस्तांना ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते मदतीचे वाटपही करण्यात आले. महावितरणच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पूर बाधितांच्या वीज बिलांना स्थगित दिली होती. पूरबाधित क्षेत्रातील परिस्थिती जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत पूरग्रस्तांना वीज बिले पाठवली जाणार नाहीत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती. ऊर्जा मंत्र्यांच्या घोषणेने पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र त्यांच्या घोषणेनंतर आठवडाभरातच महावितरणने पूरग्रस्तांना वीज बिलांच्या प्रति पाठवल्या आहेत. अधिकाऱ्यांनीच मंत्र्यांच्या घोषणेला हरताळ फासल्याने पूरबाधितांमध्ये संतापाची लाट आहे.

वाचा:

महसूल विभागाकडून अजूनही नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तातडीची मदत अजूनही अनेकांना मिळालेली नाही. एटीएम कार्ड, बँकांचे पासबुक पुरात वाहून गेले. या स्थितीत वीज बिल भरायचे कसे? असा सवाल पूरग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे. वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठचे पूरग्रस्त सुरेश इंगळे यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महावितरणमध्ये मंत्र्यांचा आदेश चालतो, की अधिकाऱ्यांचा? आमची घरे आठवडाभर पाण्याखाली होती. काही ठिकाणी अजूनही वीज सुरू नाही. मदतीचा पत्ता नाही. अशावेळी वीज बिल भरायचे कसे? वीज बिलांबाबत सांगलीतील अधिकाऱ्यांंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here