नागपुरात ११ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर काही दिवस एकही रुग्ण आढळला नाही. मात्र नंतर करोनाने शहर आणि ग्रामीणमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र होतं. मात्र आता दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात बरे होणाऱ्या करोना रुग्णांची टक्केवारी ९७.९१ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १८३ आहे.
निगेटिव्ह अहवालामुळे संभ्रम
जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या करोनाच्या अहवालात शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य दाखविण्यात आली होती. पालकमंत्री नितीन राऊत यांनीही यावर समाधान व्यक्त करून नागपूरकरांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले होते. मात्र महापालिकेने शहरात शून्य नसून एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले. कळमन्यातील एका व्यक्तीने दोनदा करोनाच्या तपासण्या केल्या, यातील पहिला अहवाल निगेटिव्ह आणि दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने हा संभ्रम निर्माण झाल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ती वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज जिल्हाधिकारी आर. विमला आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times