Tokyo : नवी दिल्ली : भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 7 पदके जिंकली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारतीय खेळाडू अर्धा डझन पदके घेऊन मायदेशी परतणार आहेत.शेवटच्या दिवशी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकल्यामुळे भारत क्रमवारीत 31व्या स्थानावर विराजमान झाला.

1) मीराबाई चानू – भारोत्तोलन – रौप्य पदक (महिला 49 किलो)
टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी भारताला पहिले पदक मिळाले होते. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. मीराबाईने एकूण 202 किलो वजन उचललं. या प्रकारात चीनच्या होउ झिहुईने सुवर्णपदक, तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कांस्य पदक जिंकले.

2) पी.व्ही. सिंधू – महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक
कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिचा पराभव करत देशाला दुसरे पदक जिंकून दिले. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते, अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे.

3) लव्हलिना बोर्गोहेन – महिला वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक
युवा बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने देशाला तिसरे पदक मिळवून दिले. उपांत्य फेरीत तिला तुर्कीच्या वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बुसानाजने पराभूत केल्याने तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. यासह ती भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी तिसरी बॉक्सरही ठरली आहे.

4) भारतीय हॉकी संघ – पुरुष हॉकी स्पर्धेत कांस्य पदक
भारताच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करून 41 वर्षानंतर पदक जिंकले. भारताचे हे ऑलिम्पिकमधील हॉकीचे 12वे पदक ठरले. याआधी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928 ते 1980च्या ऑलिम्पिकपर्यंत आठ सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली आहेत.

5) रविकुमार दहिया – पुरुष (57 किलो वजनी गट) कुस्तीमध्ये रौप्य पदक
कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक ठरले. फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूर युगूएवने रवीकुमारचा पराभव केला. त्यामुळे सुवर्ण पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

6) बजरंग पुनिया – पुरुष (फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गट) कांस्य पदक
कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. कांस्य पदकाच्या लढतीत बजरंगसमोर कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचे आव्हान होते. बजरंगने दौलतवर 8-2 असा विजय मिळवत कुस्तीत यंदाचे दुसरे पदक जिंकले. आतापर्यंत भारताने कुस्तीत सात पदके जिंकली आहेत. खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये , कांस्य पदक जिंकत कुस्तीचे पहिले पदक जिंकले होते. त्यानंतर सुशीलकुमार (2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक), योगेश्वर दत्त 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक), साक्षी मलिक (2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक), रवीकुमार दहिया (2020 टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक) यांनी पदके जिंकली आहेत.

7) नीरज चोप्रा – पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक (ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक)
भालाफेकपटू नीरज चोप्राने 87.58 मीटर भाला फेकत सुवर्णपदक निश्चित केले. यासह भारताला 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले. यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याची भारतीयांची इच्छा नीरजने पूर्ण केली. यासह अॅथलिटिक्समध्ये पहिलेवहिले पदकही त्याने मिळवून दिले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला.

जगभरातील सुमारे 205 देशांतील जवळपास अकरा हजार खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 85 देशांनी किमान एका पदकाची कमाई केली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका 36 सुवर्ण आणि एकूण 108 पदकांसह अव्वलस्थानी, तर चीन 38 सुवर्ण आणि 87 पदकांसह दुसऱ्या स्थानी राहिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here