स्पर्धेआधी भालाफेकमध्ये वेट्टरला उसेन बोल्ट समजले जाते. यावर्षी प्रबळ दावेदार असलेल्या वेट्टरला पत्रकारांनी विचारले होते की भारताच्या नीरज चोप्राबद्दल काय वाटतं? तेव्हा वेट्टर म्हणाला होता की, ‘नीरजचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. त्याला अजून खूप काही शिकायचं आहे. मला तो आव्हान देऊ शकणार नाही. माझ्यापर्यंत पोहोचायला त्याला अजून खूप मेहनत करावी लागेल. सध्या मला चिंता नाही. त्याचं काही आव्हान नाही.’
वेट्टरच्या प्रतिक्रियेबद्दल नीरजला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी पत्रकार नीरजकडे गेले आणि वेट्टरला काय उत्तर देशील असे विचारले. तेव्हा नीरज काहीच बोलला नाही. नीरज त्यावेळी का काही बोलला नाही, हे आजचा निकाल सांगून गेला. वेट्टरला हरवून नीरजने सुवर्णपदकावर नाव कोरलं.
नीरजचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या वेट्टरला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पहिल्या प्रयत्नात त्याने 82.52 मीटर भाला फेकला, पण त्याचे पुढचे दोन प्रयत्न फाऊल झाले. उर्वरीत खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने वेट्टर पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. वेट्टरचा देशबांधव युलियन वेबर 85.03 मीटर अंतरावर भाला फेकू शकला. तर पाकिस्तानचा अर्शद नदीम 82.40 मीटर अंतरापर्यंत भाला फेकू शकला. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतही नीरज पहिल्याच स्थानावर होता, तर युलियन दुसऱ्या स्थानावर होता. वेट्टर तिसऱ्या प्रयत्नातही त्याची चूक दुरुस्त करू शकला नाही, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर गेला.
वेट्टरही आहे तगडा खेळाडू
गेल्या 24 महिन्यांत 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा जोहानस वेट्टर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने असा पराक्रम 18 वेळा केला आहे. गेल्या वर्षी विश्वविक्रम करण्यापासून तो 72 सेंटीमीटर दूर राहिला होता. पोलंडच्या सिलेसियामध्ये त्याने 97.76 मीटर अंतर कापले होते. झेक प्रजासत्ताकचा जान जेलेजनी याने 98.48 मीटर भाला फेकत विश्वविक्रम केला आहे, पण टोकियोमध्ये वेट्टर काही करू शकला नाही. त्याने अंतिम फेरीत 82.52 मीटर सर्वोत्तम फेक केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times