ट्रेंट ब्रिज : भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव संपुष्टात आणला आणि त्यानंतर आता त्यांनी विजय समीप दिसू लागला आहे. पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतलेल्या भारताने इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांमध्ये संपुष्टात आणला. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली असून आता पाचव्या दिवशी भारतीय संघ किती षटकांमध्ये विजय साकारतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
इंग्लंडने आज बिनाबद २५ या धावसंख्येवरून सुरुवात केली. आजचा दिवस गाजवा तो जसप्रीत बुमराने. कारण बुमराने यावेळी इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले. बुमराला यावेळी मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी चांगली साथ मिळाली. पण इंग्लंडचा कर्णधार जो रुट यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गात उभा राहील्याचे पाहायला मिळाले. कारण एकिकडे इंग्लंडचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत असले तर रुटने मात्र शतक झळकावत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रुटच्या शतकाच्या जोरावरच इंग्लंडला यावेळी तिनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. रुटने यावेळी १४ चौकांच्या जोरावर १०९ धावांची दमदार खेळी साकारली, पण त्याचा अपवाद वगळला तर इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला यावेळी अर्धशतक पूर्ण करता आले नाही. बुमराने यावेळी भेदक मारा करत ६४ धावांमध्ये पाच फलंदाज बाद केले, शार्दुल आणि सिराज यांनी प्रत्येकी दोन तर शमीने यावेळी एक बळी मिळवला.

इंग्लंडने यावेळी भारतीय संघाला विजयासाठी २०९ धावांचे आव्हान दिले होते. यावेळी भारताच्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी दमदार सुरुवात केली. राहुलने पहिल्या डावात ८४ धावांची खेळी साकारली होती, त्यामुळे या डावातही तो मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण यावेळी स्टुअर्ट ब्रॉडने राहुलला बाद केले, राहुलने या डावात सहा चौकारांच्या जोरावर २६ धावा केल्या. भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा १ बाद ५२अशी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे उद्या पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी त्यांना १५७ धावांची गरज आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here