अकोला येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीवर एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला धमक्या देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ही घटना २०११ मध्ये घडली होती. पीडित महिला ही विवाहित असून तिला एक मुलगा आहे. आरोपीने या पीडित महिलेला एक चिठ्ठी देऊ केली. तिने ती घेण्यास नकार दिला. यावर त्याने ही चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि ‘आय लव्ह यू’ असे तो तिला म्हणाला. तसंच याबाबत कोणालाही सांगू नकोस अशी धमकीही त्याने तिला दिली होती.
या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला २ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयानेसुद्धा आरोपीला दोषी ठरविले. ‘एखाद्या महिलेची अब्रू हा तिचा सगळ्या मोठा दागिना आहे. त्यामुळे तिचा विनयभंग झाला की नाही हे ठरविण्यासाठी एखादे सरसकट समीकरण लागू करता येणार नाही. अशात एखाद्या ४५ वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे,’ असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.
दंडाची रक्कम वाढविली
आरोपीवरील विनयभंगाचा आरोप सिद्ध होतो. मात्र, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दहा वर्ष जुन्या या प्रकरणात आरोपीने ४५ दिवसांचा कारावास भोगला असून तेवढा पुरेसा आहे. मात्र, आरोपीची दंडाची रक्कम वाढवून ती ५० हजार इतकी करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times