मोदी सरकारने मोठा निर्णय घेत खेलरत्न पुरस्कारांना राजीव गांधी यांच्याऐवजी मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले आहे. या निर्णयावर काँग्रेससह इतर राजकीय पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे.
‘मोदी सरकारने राजीव गांधींचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करणे हे अनाकलनीय आहे. मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. पण राज्य हे सुडाने, द्वेषाने चालवता येत नाही ही सुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?, हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे. पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. मग मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली? किंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत स्टेडियमचे नामकरण केले. तिथेही तोच निकष लावता येईल, असा प्रश्न लोक विचारत आहेत. क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांचे प्रशासन आज गैर खेळाडूंच्याच हातात गेले आहे, हे कसले लक्षण मानायचे?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
‘महाराष्ट्राचे खाशाबा जाधव यांचे कतृत्वही मोठेच आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकणारे ते महान कुस्तीपटू होते. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली तेव्हा खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न व्हावा, असा सूज्ञ विचार कोणाच्या मनात का येऊ नये? ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर, तसे खाशाबा हे कुस्तीचे जादूगार होतेच,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीत मतभेदांना स्थान आहे, पण देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान चेष्टेचा विषय ठरु शकत नाही,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times