मुंबईः करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अखेर १५ ऑगस्टपासून लोकल सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवास करण्याची परवानगी असेल, असं जाहीर केलं आहे. मात्र, त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता भासणार आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी मोठं विधान केलं आहे.

रावसाहेब दानवे यांनी लोकल सुरू करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसंच, सध्या रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या सुरुच आहे, अशी माहितीही रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

लोकल प्रवासाच्या या पासवर क्यू आर कोड असणार आहेत त्यामुळं रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येणार आहे. मात्र, रावसाहेब दानवेंनी प्रवाशांसाठी स्मार्टफोन, क्यूआर कोड या अटींसंबंधी बोलताना राज्य सरकारने रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करायला हवी होती, असं मत व्यक्त केलं आहे.

‘क्यूआर कोड तपासण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल. त्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा उभी करावी. दोन डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. सत्यता पडताळण्यासाठी रेल्वेकडे अशी कोणती यंत्रणा नाही. प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारनेच तपासण्याची योजना करावी. ही राज्य सरकारची यंत्रणा आहे त्यामुळं त्यांनीच ओळख पटवावी,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. तसंच, ‘दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यायची होती तर सरकारने हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता,’ असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

लोकल प्रवासाचा पास कसा मिळणार?

ज्या प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील, तसेच दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारच्यावतीने अॅप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी या अॅपवर जाऊन आवश्यक माहिती भरल्यानंतर त्यांना लोकल प्रवासासाठी पास मिळेल. तर ज्यांना अॅपवरून पास घेणे शक्य नाही, त्यांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातून ऑफलाइन पास घ्यावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासवर क्यू आर कोड असतील, जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. कुणीही अवैधरित्या, बेकायदा पास मिळवू नयेत. लशींच्या दोन्ही मात्रा घ्याव्यात आणि प्रवास करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here