: राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नाशिकमध्ये असताना शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका महिलेनं पोलिस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून केला आहे.

युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी त्यांच्या पतीसमवेत पोलिस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. श्रमिक सेनेचे अजय बागुल यांच्याकडून झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांकडून कुठलीही दखल घेतली नाही, याचा निषेध म्हणून पिल्ले दाम्पत्याने आयुक्तालयापुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंबड पोलिस स्टेशन आणि इंदिरानगर पोलिस या ठिकाणी तक्रार अर्ज करून देखील न्याय मिळाला नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तालयासमोर राजलक्ष्मी पिल्ले आणि त्यांच्या पतीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

नेमकं काय आहे प्रकरण?
कारमध्ये जाणाऱ्या महिलेसह तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करणाऱ्या तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी पाठीशी घातल्याचा आरोप करीत राजलक्ष्मी पिल्ले यांनी याआधीच आत्मदहानाचा इशारा दिला होता. पिल्ले यांनी आत्मदहनाचा इशारा देताच पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आणि पोलिस महासंचालक कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

युवा स्वाभिमानी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या राजलक्ष्मी पिल्ले आणि कुटुंबीय ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सांयकाळच्या सुमारास जात असताना हा प्रकार घडला होता. संशयित आरोपी अजय बागुल, अकुंश वऱ्हाडे आणि प्रदीप चव्हाण या तिघांनी पिल्ले यांची कार अडवून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी पिल्ले यांना रामवाडी भागात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिल्ले यांनी सुटका करून थेट अंबड पोलिस ठाणे गाठले.

पिल्ले यांनी तक्रार नोंदवण्यासाठी अर्जही दिला. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. पिल्ले यांच्या पाठपुराव्यानंतर अंबड पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र, त्यात अजय बागुलचे नाव वगळण्यात आले. यानंतर पिल्ले यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे माहिती दिली. मात्र, तेथेही हालचाली झाल्याच नाही. अखेर पोलिस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून पिल्ले यांनी आपली कैफियत मांडली. तेथूनही चौकशी करण्याच्या सूचना आल्या, पण बागुलविरोधात कारवाई झालीच नाही.

अजय बागुल गुंडागर्दी करत असताना पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्याचा बचाव करण्यात येत असल्याचा आरोप पिल्ले यांनी केला. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्ताबाहेरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न पिल्ले यांनी केला असून, यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here