करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या मुंबईकरांना १५ ऑगस्टपासून प्रवास खुला करण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन पास, क्यूआर कोड आदींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने संपूर्ण नियोजन केले आहे.
दोन लसमात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर पालिकेने तातडीने त्यासाठी आवश्यक नियोजन हाती घेतले आहे. पालिकेने सर्वसामान्यांना लोकल पास उपलब्ध करताना अडचणी येणार नाहीत यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारच्या सहाय्याने येत्या दोन दिवसांत अॅप तयार केले जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त यांनी सोमवारी दिली.
६५ रेल्वे स्थानकांवर रेल्वे तिकीट आणि पाससाठी क्यूआर कोड मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेचा राज्य सरकार आणि रेल्वेसोबत समन्वय सुरू आहे. त्यासंदर्भात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल लोहाटी, विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल आणि पालिका आयुक्त चहल यांची नुकतीच पालिका मुख्यालयात चर्चाही झाली.
राज्याचे प्रधान सचिव असिम गुप्ता दोन दिवसांत क्यूआर कोडसाठीच्या अॅपबाबत घोषणा करतील, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या क्यूआर कोड मिळाल्यानंतर तिकीट खिडकीवर तिकीट किंवा पास मिळणार आहे. दरम्यान, पालिकेच्या सध्याच्या यंत्रणेवर प्रचंड ताण पडून ऑनलाइनसह ऑफलाइन पद्धत यशस्वी करताना पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे.
वाढत्या प्रवासीसंख्येचा विचार
सध्या करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या मुंबईकरांची संख्या सुमारे १९ लाख आहे. तसेच, महानगर क्षेत्रातील ठाणे, वसई, विरार, नवी मुंबई, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मिरा रोड-भाईंदर अशा एकूण १० पालिका हद्दीतून लोकल प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे ३० लाख आहे. येत्या कालावधीत दोन्ही लसमात्रा घेतलेल्यांची संख्या आणखी वाढत जाणार आहे. त्यासाठीच ६५ स्थानकांवर क्यूआर कोड मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times