बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. मात्र, मागणी करूनही रस्त्याची कामे करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने आज जिल्हा परिषदे समोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले ग्रामीण भागातील रस्त्यांची पावसाने वाट लागली आहे. हे रस्ते ग्रामीण भागातील लोकांसाठी दळणवळनाच महत्त्वाच साधन आहेत. चाळण झालेल्या या रस्त्यावर ये-जा करताना ग्रामीण भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यांसंदर्भात जिल्हा परिषदेकडे मागील १५ दिवसांपासून वारंवार सूचना, निवेदन, स्मरणपत्रे देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने मनसे आक्रमक भूमिका घेत आज अर्धनग्न आंदोलन केले.
यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलने अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times