ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची महत्वपूर्ण भूमिका मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांकडून निभावण्यात आली. दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सिजन पुरवण्यासाठी ट्रॅंकर चालकांनी महत्वाचे योगदान दिले. असं असलं तरी ट्रक चालकांच्या करोना लसीकरणाबाबत केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अनेक ट्रक चालकांकडे स्मार्ट फोन नसल्याने लसीकरणाची नोंद करण्याची पंचाइत झाली होती. तर सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये वाहतुकीच्या निमित्ताने फिरत असल्याने एका ठिकाणी लसीकरण करून घेण्याइतका वेळही मिळाला नाही. एका विशेष सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

करोना महामारीच्या सर्वाधिक आव्हानात्मक काळात अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा तसेच जोडीला ऑक्सिजन टँकर, सिलेंडर्स आणि इतर महत्वाची वैद्यकीय मदत पुरविणाऱ्या, वाहतूक चक्रामागील महत्वपूर्ण घटकाला लसीकरणामध्ये महत्वाचा समावेश आवश्यक होता. करोना योद्ध्यांसारखे आघाडीवर राहून ट्रकचालकांनी सेवा पुरवली. त्यामुळेच त्यांना स्वत:हाच्या लसीकरणासाठी वेळ देणे शक्य झाले नाही.

‘गल्फ ऑईल’या कंपनीच्या माध्यमातून हंसा रिसर्च संस्थेच्या मदतीने नुकत्याच एका सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ४०६ ट्रक चालकांनी प्रतिसाद दिला. त्यावेळी ६५ टक्के चालकांना त्यांची लसीकरणाची वेळ निश्चित करण्यासाठी तांत्रिक मदतीची गरज असल्याचे समोर आले. तर ५४ टक्के चालकांना त्यांच्या व्यवसायामुळे सतत फिरतीवर राहिल्यामुळे लसीकरणाची वेळ निश्चित करण्यासाठीचेच आव्हान होते.

त्याहीपुढे जाऊन ४० टक्के चालकांकडे तर लस कशी आणि कुठे घ्यावी याबाबत पूर्णपणे कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळेच गल्फ ऑईलने विशेष मोहिमेच्या माध्यमातून ट्रकचालकांना त्यांच्या कामाच्या जागेवर लस देण्याची सुविधा आणि त्या त्या वेळी जागेवर नोंदणी सुविधा उपलब्ध करून देत लसीकरण प्रक्रिया सोपी केली आली. नवी मुंबईमध्ये नुकतंच या संदर्भातील एक शिबीर पार पडले.

देशभरातील दहा हजाराहून अधिक ट्रकचालकांना लस देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्या अंतर्गत एक लसीकरण शिबीर नवी मुंबईतील वाशी येथे नुकतेच पार पडले. मुंबई परिसरातील सुमारे १ हजार ट्रकचालकांना यामध्यमातून लस देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले आहे. ६ ते २२ ऑगस्ट दरम्यान ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. नवी मुंबईबरोबरच नवी दिल्ली, फरीदाबाद, गाझियाबाद, मुंबई, अहमदाबाद, लखनौ, लुधियाना, जालंधर, इंदौर, कर्नाळ आणि बड्डी अशा ११ महत्वाच्या वाहतूक क्षेत्रात या लसीकरण मोहीम शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here